पुणे न्यूज

ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा शिंदे यांना ‘जनलोक वार्ता उत्कृष्ट संपादक पुरस्कार–२०२६’ जाहीर

पुणे खबर
दि.२४ जानेवारी २०२६
(पुणे प्रतिनिधी)
समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रतिमा शिंदे यांना ‘जनलोक वार्ता राज्यस्तरीय उत्कृष्ट संपादक पुरस्कार–२०२६’ जाहीर करण्यात आला आहे. अखिल जनलोक संपादन पत्रकार संघटना यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रभावी कार्य प्रतिमा शिंदे यांनी सातत्याने केले आहे. महिलांवरील अत्याचार, प्रशासकीय दिरंगाई, भ्रष्ट व्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर त्यांनी केलेल्या सडेतोड, अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखनामुळे अनेक गंभीर प्रकरणे उजेडात आली आहेत. त्यांच्या बातम्यांमुळे संबंधित प्रशासकीय व शासकीय यंत्रणांना कारवाई करावी लागली असून समाजात सकारात्मक बदल घडून आल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
पत्रकारितेच्या वाटचालीत प्रतिमा शिंदे यांनी अनेक अडचणी, संघर्ष व आव्हानांचा सामना केला. मात्र सत्य आणि न्यायासाठी त्यांनी कधीही लेखणी बंद केली नाही. निर्भीड, स्पष्ट आणि लोकाभिमुख पत्रकारिता हीच त्यांची ठळक ओळख बनली आहे.
या पुरस्काराची घोषणा करताना अखिल जनलोक संपादन पत्रकार संघटनेचे संस्थापक राज शिंगाडे यांनी सांगितले की,
“पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. प्रतिमा शिंदे यांनी आपल्या कार्यातून हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे.”
हा पुरस्कार लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार असून, या सन्माना मुळे प्रतिमा शिंदे यांच्या पत्रकारितेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे कार्य नव्या पिढीतील पत्रकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. निर्भीड व लोकाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या प्रतिमा शिंदे यांना ‘जनलोक वार्ता राज्यस्तरीय उत्कृष्ट संपादक पुरस्कार–२०२६’ जाहीर झाल्याबद्दल पुणे खबर डिजिटल मिडियाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button