पुणे न्यूज

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी “इकबाल शेख” यांची निवड.

पुणे : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ‘एनटीव्ही मराठी न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक इकबाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

इकबाल शेख यांच्या निवडीमुळे डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तब्बल २८ वर्षांपासून त्यांनी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागात वरिष्ठ पत्रकार म्हणून सातत्याने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पत्रकारितेतील दांडगा अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेली तत्परता यामुळे शेख यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील अग्रगण्य संघटनांपैकी एक असून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत संघटनेचे मजबूत जाळे आहे.

इकबाल शेख यांनी संघटनेच्या विस्तारासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निवडीनंतर बोलताना इकबाल शेख यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेची ताकद राज्यभर अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button