पुणे न्यूज

हज यात्रेकरूंसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

खुद्दामे हुज्जाज पुणे जिल्हा कमिटीचा उपक्रम; हज २०२६ साठी सखोल मार्गदर्शन.

पुणे खबर दि. २२ जानेवारी २०२६

(पुणे : प्रतिनिधी)
हज यात्रा २०२६ साठी निवड झालेल्या यात्रेकरूंना योग्य धार्मिक, व्यवहारिक व आरोग्यविषयक माहिती मिळावी, या उद्देशाने खुद्दामे हुज्जाज पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने १० जानेवारी ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष तरबियती (प्रशिक्षण) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम पेन्शनवाला मस्जिद, नाना पेठ, पुणे येथे दर शनिवारी व रविवारी आयोजित करण्यात येत आहे.

खुद्दामे हुज्जाज पुणे जिल्हा कमिटी गेल्या २० वर्षांपासून हज यात्रेकरूंना सातत्याने सेवा देत असून, हज अर्ज (फॉर्म) भरण्यापासून ते प्रत्यक्ष प्रवासापूर्वीच्या चार महिन्यांच्या सखोल प्रशिक्षणापर्यंत सर्वांगीण मार्गदर्शन करत आहे. या प्रशिक्षणामध्ये हजचे फर्ज, वाजिब व सुन्नत, इहराम, तल्बिया, तवाफ, सई, अराफात, मुझदलिफा व जमरात याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. तसेच व्याख्यान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी, शिस्त, संयम, आरोग्यविषयक सूचना व आवश्यक लसीकरण (इंजेक्शन) याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने हज कमिटी ऑफ इंडियाचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शहानवाज सी. यांचा खुद्दामे हुज्जाज पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने कमिटीचे अध्यक्ष हाजी रियाज इस्माईल काझी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खुद्दामे हुज्जाज कमिटीच्या सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी हज ही केवळ धार्मिक यात्रा नसून आत्मशुद्धी, संयम, शिस्त व भाईचाऱ्याचा संदेश देणारी महान इबादत असल्याचे सांगितले. तसेच योग्य प्रशिक्षणामुळे हज यात्रेकरूंना प्रत्यक्ष यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणी सहजपणे पार करता येतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे हज यात्रेकरूंमध्ये आत्मविश्वास वाढत असून, नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने हज अदा करण्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित हज यात्रेकरूंनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button