पुणे न्यूज

पुण्यातील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांच्या मनमानी शुल्काविरोधात आजाद समाज पार्टी आक्रमक; ‘शासन दरपत्रक लागू करा’ची मागणी

पुणे खबर दि. ९ डिसेंबर २०२५

पुणे: जिल्ह्यातील खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या अवाजवी शुल्क आकारणी, अनियमित बिलिंग आणि रुग्णांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी आजाद समाज पार्टी (कांशीराम) पुणे जिल्हा (पश्चिम विभाग) यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला (दिनांक ०८ डिसेंबर) रोजी एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. शासनाचे दरपत्रक त्वरित लागू करण्याची आणि रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
राजू शिवाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांना निवेदन सादर केले. निवेदनात खालील प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या:

  • शासनाच्या नियमांनुसार मान्यताप्राप्त दरपत्रक रुग्णालयांमध्ये स्पष्टपणे लावणे बंधनकारक करावे.
  • रुग्णांवर अनावश्यक व महागड्या तपासण्यांची सक्ती त्वरित थांबवण्यात यावी.
  • आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत केलेल्या उपचारांची माहिती शासनाला नियमित देणे बंधनकारक करावे.
  • रुग्णाला डिस्चार्जवेळी सविस्तर व पारदर्शक बिल द्यावे.
  • मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णाला आधी संपूर्ण रक्कम देण्याची जबरदस्ती थांबवावी.
  • रुग्णालयांच्या बिलिंगची पडताळणी करणारी जिल्हास्तरीय तपास समिती नेमण्यात यावी.
  • प्रत्येक रुग्णालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात यावा.

१० दिवसांची अंतिम मुदत – अन्यथा तीव्र आंदोलन.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. “जर १० दिवसांच्या आत दरपत्रक लागू करणे आणि इतर मागण्यांवर कारवाई झाली नाही, तर आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन, धरणे आणि आमरण उपोषण करेल,” असे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव भीमराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सलीम अकबर सलगर, किशोर निकाळजे, जिल्हा सचिव दिनकर हंकारे, जिल्हा कोशाध्यक्ष शंकर कांबळे, पुणे शहर अध्यक्ष संजय कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष सारिका सलगर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतेज गायकवाड, शहर सचिव रोहन पठाडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button