संपादकीय

कामगार आणि वंचितांसाठी लढणारा ‘आधारवड’ हरपला!

श्रमिकांचा आधारवड कोसळला, कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान देणारा हात अनंतात विलीन

पुणे खबर दि. ८ डिसेंबर २०२५
महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचा आश्रय, वंचितांचा आवाज आणि असंघटित मजुरांसाठी आयुष्य पेटवून टाकलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आज दि.८ डिसेंबर रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.
एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात आज एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

-श्रमिकांना संघटित करणारा थोर प्रयत्न
हमाल, बांधकामकामगार, रिक्षाचालक, रोजंदारीवर जगणारे मजूर, या समाजाचा आवाज कुणी ऐकावा? न्याय कुणी द्यावा?या प्रश्नांना उत्तर म्हणून आढाव यांनी आपल्या आयुष्याची उभी घालमेल केली.पुण्यात उभी केलेली ‘हमाल पंचायत’ ही भारतातील असंघटित कामगारांच्या हक्कांसाठीची सर्वात यशस्वी आणि प्रेरक चळवळ ठरली.
कामगारांना ओळखपत्र, ठराविक वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य योजना, वृद्धापकाळाचा आधार, हे सारे काही त्यांनी संघर्षाने मिळवून दिले.
कष्टकरी मजुरांच्या आयुष्याला सन्मान मिळवून देणारे ते खरे भूजलयोद्धे होते.

एक गाव – एक पाणवठा’ : समतेचा ऐतिहासिक लढा
दलितांवर पाण्याचाही भेदभाव, ही शरमेची परंपरा तोडून टाकण्यासाठी त्यांनी उभारलेली ‘एक गाव – एक पाणवठा’ चळवळ महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनात निर्णायक ठरली.
गावोगावी जातपात मोडून काढत, संवाद–संघर्ष–जागरूकता यांच्या जोरावर त्यांनी पाणवठे सर्वांसाठी खुले केले.
हा लढा फक्त पाण्यासाठी नव्हता तो होता स्वाभिमान, समानता आणि मानवी प्रतिष्ठा यांसाठी होता.

फुले,आंबेडकरी विचारांचा ज्वलंत वाहक
आढाव यांचे विचार साधे पण तेजस्वी होते,
मनुष्य मोठा की जात?
अधिकार मोठा की सत्तेचा गर्व? समानता हीच खरी प्रगती. सत्यशोधकांच्या परंपरेतील ते निष्ठावंत वारस होते. त्यांनी कधीही पदाची, प्रसिद्धीची किंवा सत्तेची इच्छा धरली नाही.
कष्टकऱ्यांचे आयुष्य बदलणे हीच त्यांची पूजा, प्रार्थना आणि तपश्चर्या राहिली.

आयुष्यभर संघर्ष… आणि शेवटपर्यंत सक्रियता
९५ वर्षांचे वय पार करूनही त्यांच्या आवाजाचा जोश कमी झाला नाही.
असंगठित कामगारांच्या सामाजिक सुरक्षा योजनांबाबत ते सतत अभ्यास करत, सरकारशी संवाद साधत आणि चळवळींना दिशा देत राहिले.
कुठलीही सभा असो, निदर्शनें असो किंवा चर्चासत्र “कष्टकऱ्यांचे काय?” हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा.

आजची मोठी पोकळी
त्यांच्या जाण्याने
हमालांचे हात थरथरले,
मजुरांच्या डोळ्यात धुकं दाटलं,आणि सामाजिक चळवळींच्या आकाशात एक स्थिर तारा हरपला.
आढाव यांना वडिलधाऱ्यांसारखं स्थान, भाऊसारखी जवळीक आणि नेत्यासारखी दृष्टी,सगळं काही होतं.
त्यांच्या पायाभरणीवर महाराष्ट्रातील असंख्य कामगार संघटना उभ्या राहिल्या. त्यांच्या कार्याची अमर देणगी, हमाल पंचायतचे ऐतिहासिक मॉडेल,असंघटित मजुरांच्या हक्कांसाठी संघर्ष,
जातिभेद निर्मूलनाची क्रांतिकारी पद्धत, सामाजिक सुरक्षेचे धोरणकर्ते,
तत्त्वनिष्ठ, सन्मानपूर्वक आणि निर्व्याज सेवा.

आज श्रमिकांचा आधारवड कोसळला, कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान देणारा हात अनंतात विलीन झाला.
पण त्यांच्या संघर्षाची मशाल आपण जिवंत ठेवणार आहोत. डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव आपण महाराष्ट्राला दिलेली सामाजिक दृष्टि आणि मानवी मूल्ये अमर आहेत, ते चिरंतन राहतील. आपल्या कार्याला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी श्रद्धांजली.

संपादक
रज्जाक साहेबलाल शेख,
निर्भीड व निष्पक्ष खबर “पुणे खबर “
7038729343

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button