तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात.

(तळेगाव दाभाडे प्रतिनिधी)
१३ ऑगस्ट २०२५
भावंडांच्या नात्याचा स्नेह आणि प्रेम जपणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्षा अलका कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात बहिणींनी पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित बहिणींनी सांगितले की, पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षेसाठी २४ तास सज्ज असतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या या शुभ दिनी त्यांच्या त्याग आणि कार्याची कृतज्ञतेने दखल घेणे ही आमची जबाबदारी आहे.

या कार्यक्रमाला वृषाली वीरगुर्जर, सुनिता कदम, माधुरी पालेकर, सुरेखा सरोदे, लीलावती अहिवळे, मीनाक्षी गोतारणे, शितल ओवाळ, सलोनी ओवाळ, आशा ओव्हाळ आदी महिला उपस्थित होत्या. सर्वांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून मिठाई वाटप केले.

कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाण्यात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. बहिणींनी राखी बांधताच पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. या उपक्रमामुळे समाजातील बंधुभाव आणि ऐक्य अधिक दृढ होण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेवटी पोलीस बांधवांनीही बहिणीच्या प्रेमळ सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

