शाळांमध्ये ‘पसायदान’ सक्तीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे निवेदन.

अहमदपूर (दि. ४ ऑगस्ट २०२५)
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शाळेत सक्तीने ‘पसायदान’ म्हणविण्याचा दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सत्तार हबीबसाब शेख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसिलदार अहमदपूर मार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून सर्व धर्मीयांना त्यांच्या श्रद्धेनुसार आचरण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. शासनाने दिलेला परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.२७२/एस.डी.४ हा आदेश धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांवर आघात करणारा आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

“महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदू धर्मासह मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन इत्यादी विविध धर्मीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा स्थितीत कुठल्याही एका धर्माचे गीत, प्रार्थना किंवा काव्य सर्वांवर सक्तीने थोपवणे चुकीचे आहे,” असे शेख यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सुचवले की, सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देणाऱ्या कविता, नज्म, गीतांचा समावेश शाळांमध्ये करावा. तसेच, सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना सक्ती न करता स्वेच्छेने सहभागाची मुभा देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करून, देशप्रेम, एकता आणि समता वाढवणाऱ्या साहित्याचे शालेय स्तरावर प्रोत्साहन देण्याची मागणी सत्तार शेख यांनी केली आहे.
यावेळी महासचिव शिवानंद कांबळे, सचिव किशनराव ढवळे, सचिव ससाणे, उपाध्यक्ष लखन ढवळे, भारत ढवळे, सल्लागार पांडुरंग कांबळे,व वंचित बहुजन आघाडी अहमदपूर चे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.