निगडीत विश्वशांती बुद्ध विहारात ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात साजरा.

संविधानाचे महत्त्व पटवून देत मान्यवरांकडून शुभेच्छा.
पुणे खबर दि.३० नोव्हेंबर २०२५
निगडी: येथील दळवी नगर, सेक्टर नंबर २२ मधील विश्वशांती बुद्ध विहारामध्ये २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन करून उपस्थितांना संविधानाचे महत्व सखोलपणे पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष रामचंद्र आचलकर, भारतीय बौद्ध महासभा पिं. चिं. जिल्हा (फ) प्रभाग अध्यक्ष प्रशांत नाटेकर, पिं. चिं. शहर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दीपक भालेराव, तसेच निगडी प्रभाग अध्यक्ष सुधीर लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या महान संविधानाची महती विशद केली. सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असलेल्या संविधानाचे संरक्षण करणे, ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.

विहारातील कमिटी चे सदस्य, तसेच पुरुष आणि महिला कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सामूहिक उद्देशिका वाचनानंतर मान्यवरांनी आणि उपस्थितांनी एकमेकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वशांती बुद्ध विहाराच्या कमिटीने विशेष परिश्रम घेतले.



