‘संविधान का बदलावे?’ पुस्तकाच्या लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

पुणे २९ जुलै २०२५
‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाच्या प्रकाशनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ॲड.शिवाजी कोकणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी पुण्यातील नवी पेठेतील पत्रकार भवन येथे होणार होते. या पुस्तकामध्ये भारतीय संविधानाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन देत या पुस्तकाचे लेखक व प्रकाशन सोहळ्याचे आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित पुस्तक हे भारतीय संविधानाचा जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या उद्देशाने लिहिले गेले असून त्याचा प्रचार-प्रसार केल्यास समाजात तेढ निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण मानून तात्काळ संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.

या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये लेखक ॲड. शिवाजी कोकणे यांच्यासह मिलिंद एकबोटे, सचिन पाटील, बाळासाहेब जमादार (माळवदकर), संजय विठ्ठल जठर, भालचंद्र कुलकर्णी, पराशर मोने, ॲड. रोहन जमादार (माळवदकर), डॉ. श्रीकांत शिवाजीराव शिंदे आणि सविता कुरूंदवाडे यांचा समावेश होता. या सर्वांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या कोणत्याही लिखाणास किंवा कार्यक्रमास कायद्याने पाठींबा देता येणार नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांना परवानगी नाकारावी,” अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
हा प्रकार सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरला असून पोलिस प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



