श्रीमती नारायणदेवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

१६ ऑगस्ट २०२६ | देहूरोड
देहूरोड :- शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकांच्या सेवेसाठी सदैव धावून जाणारे श्रीमती नारायणदेवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांच्या नावातच ‘ईश्वर’ असून, सर्व धर्मीयांना सोबत घेऊन सेवाभावी उपक्रम राबविणारे ते समतादूत व्यक्तिमत्त्व आहेत. अशा सेवाभावी संस्थेच्या वतीने बहुजन मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिवीर शहीदांना अभिवादन करून ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला, ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन देहूरोड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूर शेख यांनी केले.

श्रीमती नारायणदेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभात अध्यक्षीय भाषण करताना गफूर शेख बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आंध्र प्रदेश हून आलेले उद्योगपती व सामाजिक चळवळीतील नेते रवींद्र राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी श्रीमंत शिवशरण व संजय पिंजण यांनी आपले विचार व्यक्त केले. ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल व उपाध्यक्षा अनिता अगरवाल यांच्या हस्ते प्रमुख अतिथी रवींद्र राव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गफूर शेख यांचा सन्मान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना रवींद्र राव म्हणाले, “परम स्नेही मित्रांच्या भेटीसाठी आलो असताना मान्यवरांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला, हा माझ्यासाठी भाग्याचा आणि सन्मानाचा क्षण आहे.”
यावेळी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतिवीर शहीदांना अभिवादन करण्यात आले. तसेच ट्रस्टच्या विविध सेवाभावी उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या स्नेही परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पू शिवशरण यांनी केले.
समारंभास देहूरोड शहरातील ज्येष्ठ कांतीशेठ पारेख, बहुजन चळवळीतील इंद्रपालसिंग रत्तू, अरुण जगताप, रिक्षा संघटनेचे रफिक शेख, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, पत्रकार चंद्रशेखर पात्रे, राजू पंडित, मोजेस दास आदी मान्यवर उपस्थित होते.



