रिपब्लिकन वाहतूक आघाडीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व संघर्ष न्यायिका फातिमामाई शेख यांची जयंती साजरी.

पुणे खबर
देहूरोड | दि. १० (प्रतिनिधी):
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले आणि त्यांना या कार्यात साथ देणाऱ्या देशातील पहिल्या मुस्लीम शिक्षिका संघर्ष न्यायिका फातिमामाई शेख यांची संयुक्त जयंती देहूरोड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन वाहतूक आघाडी देहूरोड शहरच्या वतीने ऐतिहासिक सुभाष चौकात या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस आषिश बन्सल व ज्येष्ठ सामाजिक नेते जावेद सिकीलकर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तर, फातिमामाई शेख यांच्या प्रतिमेस रिपब्लिकन पुणे जिल्हा युवा नेते अमित छाजेड व उत्तम अलकुंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी दै. विशाल संविधानचे सह-संपादक व भारतीय संविधान सन्मान रॅली समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे, राकेश वाल्मिकी, प्रकाश लोखंडे आणि देहूरोड शहर रिक्षा वाहतूक सेवा संघटनेचे रफिक शेख यांनी प्रतिमांना पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
आपल्या मनोगतात जावेद सिकीलकर आणि अशोक कांबळे यांनी सावित्रीमाई फुले आणि फातिमामाई शेख यांच्या ऐतिहासिक मैत्रीचा आणि संघर्षाचा उल्लेख केला. स्त्री शिक्षणासाठी या दोन्ही महामातांनी सोसलेले कष्ट आणि त्यांचे कार्य समाजासाठी आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन रिपब्लिकन वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष घुसर गांधी व युवा नेते अमित छाजेड यांनी केले होते. या प्रसंगी मुस्लिम विकास विचार मंच चे अध्यक्ष रज्जाक शेख, अन्वरअली शेख, सचिन जोगदंड, रफिक अब्बास शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




