पुणे-पिंपरीच्या निवडणुकीत अजितदादांना मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची साथ; राष्ट्रवादी काँग्रेसला (AP) अधिकृत पाठिंबा जाहीर.

पुणे खबर
९ जानेवारी २०२६
(पिंपरी चिंचवड| प्रतिनिधी)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. ‘मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन’ने या दोन्ही महापालिका निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

अजितदादांची विकासाची ग्वाही
या बैठकीस स्वतः अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजाशी संवाद साधताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कासाठी, सामाजिक सुरक्षेसाठी आणि शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे. समाजाच्या प्रगतीमध्ये कोणतीही उणीव भासू दिली जाणार नाही.” अजितदादांनी दिलेल्या या शब्दावर संघटनेने आपला विश्वास व्यक्त केला आहे.

’अजितदादा म्हणजे कृतीशील नेतृत्व’ – सलीम सारंग
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले:
”अजितदादा हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून वाटचाल करणारे नेतृत्व आहे. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) भूमिकेतून काम केले असून मुस्लिम समाजाच्या अडचणीच्या काळात ते केवळ शब्दांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून पाठीशी उभे राहिले आहेत. याच अनुभवाच्या जोरावर आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

निवडणुकीवर होणार मोठा परिणाम
या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अल्पसंख्याक मतदारांची मोठी ताकद अजित पवार यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या या निर्णयामुळे दोन्ही शहरांतील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.


