पिंपरी-चिंचवडमध्ये; ‘एक संधी वंचितला’ सभेतून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार.

पुणे खबर दि. १० डिसेंबर २०२५
(पिंपरी चिंचवड प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘एक संधी वंचितला’ या भव्य निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा राजकीय वातावरण ढवळून काढणारी ठरणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सभा शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या (भीमसृष्टी) मागील मैदानात होणार आहे. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सभेतून महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल फुंकले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत नितीन गवळी यांनी दिले.
यावेळी बोलताना गवळी यांनी स्पष्ट केले की, सभेच्या सुरुवातीला भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे कार्यकर्त्यांना दिशा देणार असून, त्यांच्या भाषणातून आगामी निवडणुकीवर मोठी घोषणा अपेक्षित आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पाणी समस्या, अनियंत्रित विकास, कामगारांचे प्रलंबित प्रश्न तसेच विस्थापितांच्या मागण्या या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीची ठोस भूमिका या सभेतून जाहीर होईल. गवळी म्हणाले की, “वंचित समाजाच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा उभारला जाणार आहे. ‘एक संधी वंचितला’ या सभेतून पक्ष आपली दिशा, ध्येय आणि ठोस भूमिका जनतेसमोर मांडणार आहे.”
यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी विश्वास व्यक्त केला की, शहरातील पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, कामगारांचे प्रश्न, तसेच विकासकामांमधील असमतोल यावर पक्ष परखड भूमिका घेणार असून, प्रकाश आंबेडकरांचे भाषण नागरिकांना नव्या राजकीय पर्यायाची हमी देईल.

पिंपरीतील हॉटेल नमस्कार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सभेची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, सर्वजीत बनसोडे, शहर कार्याध्यक्ष राजेंद्र साळवे, शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड, महिला शहराध्यक्षा शारदा बनसोडे, युवक शहराध्यक्ष विनोद गायकवाड, महासचिव जितेंद्र मोटे, सचिन ओव्हाळ, सुजाता निकाळजे, मंदाकिनी गायकवाड, सुनील जावळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेला ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत नेत्या अंजलीताई आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिल अण्णा जाधव, ऍड सर्वजीत बनसोडे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहराध्यक्ष नितीन गवळी भूषवणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

