मनसेच्या विनोद भंडारी यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन; ‘शेतकरी आठवडा बाजार’ केवळ व्यापाऱ्यांचा अड्डा!

पुणे खबर दि. १२ डिसेंबर २०२५
किवळे (देहूरोड):-
पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये सुरू असलेल्या ‘शेतकरी आठवडा बाजारामुळे’ नागरिकांना होणाऱ्या प्रचंड त्रासाबाबत मनसेचे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) संघटक विनोद भंडारी यांनी महापालिका आयुक्त साहेब यांना निवेदन सादर केले आहे. हा बाजार मूळ उद्देशापासून भरकटला असून, तो केवळ व्यापाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दिनांक १२/१२/२०२५ रोजी आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात, भंडारी यांनी नमूद केले आहे की, प्रभाग १६ मधील या आठवडा बाजारात थेट शेतकरी न येता, मोठे व्यापारी येत आहेत. हे व्यापारी ग्राहकांना महाग दरात भाज्या विकून शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे मोठे नुकसान करत आहेत.

वाहतूक आणि अपघातांचा धोका
या बाजाराच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहतुकीची मोठी समस्या (Traffic Problem) निर्माण झाली आहे. विशेषतः सदर रस्ता बीआरटी (BRT) असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. आठवडा बाजारामुळे सतत वाहतूक कोंडी होते आणि अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे, असे भंडारी यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
‘शेतकरी बाजार’ मूळ उद्देशापासून दूर
‘शेतकरी आठवडा बाजार’ सुरू करण्याचा मूळ उद्देश ग्राहकांना थेट शेतातून स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध व्हावा हा होता. मात्र, सध्या प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
महत्त्वाच्या मागण्या:
विनोद भंडारी यांनी आयुक्तांकडे खालील मागण्या केल्या आहेत:
- सदर जागा भाजी मंडईसाठी आरक्षित करावी.
- योग्य पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करावी.
- यामुळे स्थानिक व्यापारांना, नवीन उद्योजकांना तसेच महिला बचत गटांना व्यवसाय करण्याची संधी मिळेल.
- प्रभागातील नागरिकांना स्वस्त दरात थेट शेतीमधील भाजी मिळेल.
- वाहतूक कोंडी करणाऱ्या संबंधित गाड्यांवर त्वरित कारवाई करावी.
या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची विनंती भंडारी यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहर,अतिक्रमण विभाग आणि पोलीस आयुक्तालय वाहतूक विभाग यांनाही रवाना करण्यात आली आहे.



