देहूरोड येथे श्री गणेश जयंती व सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार.

पुणे खबर
दि. २० जानेवारी २०२६
(देहूरोड प्रतिनिधी)
देहूरोड:-येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर व त्रिशूल मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश जयंती व मंदिराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा धार्मिक सोहळा गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ (मिती माघ शुद्ध ४) रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ७.१५ ते ८.४५ वाजता श्रींचा पूर्ण पूजन (पंचामृत) अभिषेक, त्यानंतर पुण्याह वाचन, नवग्रह व मुख्य देवतांचे पूजन, तसेच होम-हवन, फलाशिर्वाद, पूर्णाहुती व बलिदान हे विधी संपन्न होणार आहेत.
सकाळी ११.०० ते १२.१५ या वेळेत ह.भ.प. प्रमोद महाराज पवार (ताथवडे) यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता गणेश जन्म व महाआरती मान्यवरांच्या हस्ते पार पडणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळच्या सत्रात विविध भजन कार्यक्रम होणार असून श्री गुरुकृपा महिला भजनी मंडळ, ॐ नमो शिवाय महिला भजनी मंडळ व सदगुरू भजनी मंडळ यांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होईल.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह.भ.प. मुकुंद महाराज राऊत (नाना) असून कार्यक्रमाचे आयोजन श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर, त्रिशूल मित्र मंडळ ट्रस्ट व सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी केले आहे.
सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





