त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

पुणे खबर दि. ७ फेब्रुवारी २०२६
देहूरोड | प्रतिनिधी
मुस्लिम विकास विचार मंच व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती महा माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती देहूरोड शहरात अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, स्त्री-सक्षमीकरण व त्याग मय जीवनाचे प्रतीक असलेल्या महा माता रमाई आंबेडकर यांच्या कार्यास यावेळी अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महा माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस ह. भ. प. क्षीरसागर महाराज, गफूर शेख, ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे व रामहरी वाघ यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी महा माता रमाई यांच्या त्याग, संघर्ष व बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदाना वर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह गौस सुनार, अन्वरअली शेख, जाहिद शिकीलकर, सुरेश भालेराव, प्रकाश कांबळे (रुईकर), एम. डी. चौधरी, राहुल खांडेकर, चंद्रकांत गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महा माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकरी बुद्धिस्ट समाज मंचच्या वतीने उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुता व एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब धावारे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून महा माता रमाई आंबेडकर यांचे कुटुंबीय, सामाजिक व संघर्षमय जीवन नव्या पिढीसाठी आदर्श असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अन्वरअली शेख यांनी सर्व मान्यवर, आयोजक, उपस्थित नागरिक व सहकाऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महा माता रमाई आंबेडकर यांचे विचार, त्याग मय जीवन व सामाजिक योगदान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारचे उपक्रम समाजात समता, बंधुता व मानवतेची भावना दृढ करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे रामहरी वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.




