काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ‘घंटागाडी’ लोकार्पण व सामाजिक उपक्रमांनी रंगला सोहळा.

पुणे खबर दि. ३ जानेवारी २०२६
लातूर (प्रतिनिधी)
नव्याने स्थापन झालेल्या काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीने आपल्या प्रगतीची यशस्वी चार वर्षे पूर्ण केली आहेत. ३१ डिसेंबर २०२१ रोजी स्थापना झालेल्या या ग्रामपंचायतीचा चौथा वर्धापन दिन व नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरे करण्यात आले.

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या ताफ्यात नवीन घंटागाडी दाखल झाली असून, तिचे रीतसर लोकार्पण करण्यात आले. यामुळे गावातील स्वच्छता मोहिमेला अधिक बळकटी मिळणार आहे. केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक जाणीव ठेवत, ग्रामस्थांच्या वतीने दुपारी ४ वाजता “मातोश्री वृद्धाश्रम” येथे फळवाटप आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवून ग्रामस्थांनी हा आनंद द्विगुणित केला.

प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन काशिलिंगेश्वर नगर आदर्श ग्रामपंचायतीचे निर्माते अॅड. किरण बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी अॅड. प्रभाकर केदार, महादेव जमादार, श्रीमंत भताने, विष्णू काका शिंदे, बस्वराज खानापूरे, आकाश जमादार, रघुनाथ गिरी, परमेश्वर माने, शिवाजी जाधव, अॅड. योगेश बनसुडे, हनुमंत मुंडे, उदय भैय्या गोजमगुंडे, दामोदर लहाने, उद्धवराव जाधव, श्रीहरी दुवे आणि संगादेव फड यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायतीने विकासाचे अनेक टप्पे गाठले असून, येणाऱ्या काळातही लोकसहभागातून आदर्श गाव घडवण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

