वडगाव मावळ

इंदुरीत बौद्ध स्तूपाचा अवमान; प्रशांत जोगदंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली कारवाईची मागणी

पुणे, दि. ०८ नोव्हेंबर २०२५ – मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भंडारा डोंगरावर असलेल्या प्राचीन बौद्ध स्तूपावर काही अज्ञात व्यक्तींनी बौद्ध धर्माच्या तत्त्वांशी विसंगत अशी कृती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी या ऐतिहासिक स्तूपावर साडी, झंपर, बांगड्या, मंगळसूत्र, चप्पल आदी वस्तू ठेवून पारंपरिक देवपूजेप्रमाणे पूजा-अर्चा केली. बौद्ध धर्मात अशा प्रकारची पूजा निषिद्ध असून, ही कृती धर्माच्या पवित्र तत्त्वांचा अवमान करणारी असल्याचे सांगितले जाते.

ही घटना दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली असून, त्याचे फोटो आणि पुरावे मानव अधिकार व माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जोगदंड यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना सादर केले आहेत. त्यांनी या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर तात्काळ चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रशांत जोगदंड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की –

“बौद्ध स्तूप हा भगवान बुद्धांच्या स्मृतीचे प्रतीक आहे. त्यावर दागिने व पूजेच्या वस्तू ठेवणे हे बौद्ध तत्त्वांविरुद्ध असून, समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे”

तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत —

1.घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
2.स्तूपावरील ठेवलेल्या वस्तू हटवून मूळ स्थिती पुनर्स्थापित करावी.
3.अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तेथे सूचनाफलक लावण्यात यावेत.
4.पुरातत्त्व व पोलीस विभागाने या ठिकाणाची देखरेख वाढवावी.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बौद्ध अनुयायांनी या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button