देहूरोड युवक काँग्रेसकडून भाजपा प्रवक्त्याविरोधात तक्रार; राहुल गांधींवरील धमकीच्या वक्तव्यावरून कायदेशीर कारवाईची मागणी.

पुणे खबर
देहूरोड, दि. ४ ऑक्टोबर २०२५
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केरळ भाजपाच्या प्रवक्ते प्रिंटू महाजन यांनी दिलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ देहूरोड युवक काँग्रेसने आज देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या वक्तव्यामुळे देशभरातून राजकीय वातावरण तापले असून, युवक काँग्रेसने या प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या सुचनेनुसार आणि भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आदेशानुसार करण्यात आली.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, २८ सप्टेंबर २०२५ रोजी न्यूज १८ केरळ वाहिनीवर झालेल्या एका लाईव्ह डिबेट कार्यक्रमात प्रिंटू महाजन यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात ‘छातीत गोळी झाडू’ असे धमकीचे वक्तव्य केले. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याला काँग्रेसने ‘हिंसेची भाषा’ आणि ‘लोकशाहीविरोधी’ ठरवले असून, देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते या प्रकरणात भाजपावर टीका करत आहेत.देहूरोड युवक काँग्रेसचे अध्यक्ष मलिक शेख यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत म्हटले आहे की, असे वक्तव्ये लोकशाही मूल्यांना धक्का लावणारे असून, याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून प्रिंटू महाजन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मलिक शेख म्हणाले, “राहुल गांधी हे देशाच्या युवक आणि गरीबांच्या हक्कांसाठी लढणारे नेते आहेत. भाजपाच्या या हिंसक वक्तव्यांना आम्ही कधीही सहन करणार नाही. हे वक्तव्य केवळ धमकीच नव्हे, तर संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि लोकशाहीवर हल्ला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी.”यासाठी देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी देहूरोड युवक काँग्रेसचे अध्यक्ष मलिक शेख, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, उपाध्यक्ष निलेश बोडके, उपाध्यक्ष हितेश चहर, मावळ उपाध्यक्ष रईस शेख, शिवा अलकोंडे आणि देहूगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष व युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक श्रीगणेश मुसुडगे सहभागी झाले होते.



