देहूरोड रेल्वे स्टेशन येथे आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी आणून पाडला.

देहूरोड, दि. १० जुलै २०२५
रेल्वे प्रवासी संघ,देहूरोड यांच्या वतीने आज देहूरोड रेल्वे स्टेशन येथे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान, संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी महिलेच्या वेशात (गाउन, ओढणी, रॉकेलची बाटली आणि छत्री) वेषांतर करून चालत्या रेल्वे समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी सतर्कता दाखवत त्यांना ताब्यात घेतले आणि हा प्रयत्न हाणून पाडला.

आंदोलनाचे कारण
गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, जी देहूरोड येथे थांबत असे आणि पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची होती, ती बंद करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी संघाने ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार केली आहे. तसेच, जर ही गाडी तात्काळ सुरू होऊ शकत नसेल, तर पर्यायी दुसऱ्या गाडीला देहूरोड येथे थांबा द्यावा, अशी मागणी आहे. मात्र, मंडल रेल प्रबंधक, पुणे यांच्याकडून केवळ प्रस्ताव पाठवण्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी आज आत्मदहनाचा आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी रघु गव्हाळे, अजय बरवारिया, मेघराज तंतरपाळे, अन्वर तांबोळी, राजकुमार कलिमुर्ती, नंदू शेजुळे, सुलतान शेख, सुभाष म्हस्के, भाजपा नेते सूर्यकांत सुर्वे, अनिल खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते जलाल शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवाशांचे हाल: कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस ही गोरगरीब प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची गाडी होती. तिच्या बंद होण्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रवासी संघाने यापूर्वी अनेकदा निवेदने, आंदोलने आणि चर्चा केल्या, परंतु रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज तीव्र पाऊल उचलण्यात आले असल्याचे तंतरपाळे यांनी पुणे खबर प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.

पोलिसांचा हस्तक्षेप: धर्मपाल तंतरपाळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता टळली, परंतु रेल्वे प्रवासी संघाने जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा धर्मपाल तंतरपाळे यांनी दिला आहे.

रेल्वे प्रवासी संघाने मंडल रेल प्रबंधक, पुणे यांना आवाहन केले आहे की, लवकरात लवकर कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस किंवा पर्यायी गाडी देहूरोड येथे थांबवावी. अन्यथा,भविष्यात आणखी तीव्र आंदोलने छेडली जातील, असे संघाने स्पष्ट केले आहे.



