राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांकडून संग्राम जगताप यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाईची मागणी.

मुंबई, दि. २१ जून २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम समाजाविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सलीम सारंग यांनी याबाबत अजित पवार यांना पत्र लिहून पक्षाच्या धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या या वक्तव्यांवर चिंता व्यक्त केली आहे.
सारंग यांनी पत्रात म्हटले आहे की, संग्राम जगताप यांनी “जहाँ आयेगा लांडा, वहाँ आयेगा डांडा” आणि “जहाँ आयेगा अली, वहाँ आयेगा बजरंगबली” अशी भडकाऊ आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. यापूर्वीही त्यांनी मुस्लिम समाजाविरोधात अशीच वक्तव्ये आणि कृती केल्याचा आरोप आहे.अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळण्याची भीती असून, मुस्लिम समाजात पक्षाविरोधात नाराजी पसरू शकते,असे सारंग यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे पालन केले असून, धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हा पक्षाचा पाया आहे, असे सलीम सारंग यांनी पत्रात अधोरेखित केले. अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी नेहमीच काम केले असताना, पक्षातीलच काही नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे पक्षाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
येत्या मोहरमच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही याचा पक्षाला फटका बसू शकतो, असे सारंग यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी अजित पवार यांना संग्राम जगताप यांना समज देऊन पक्षाची निंदनीय प्रतिमा सुधारण्यासाठी आणि जनमानसात योग्य संदेश पोहोचवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली आहे.
या पत्रामुळे पक्षांतर्गत आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यावर पक्ष नेतृत्व काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




