जालना डी.वाय.एस.पी अनंत कुलकर्णींच्या ‘फिल्मी स्टाईल’ लाथ प्रकरणाची दखल; राज्य मानव हक्क आयोगाने गृह विभाग, पोलिस अधिकाऱ्यांना २४ फेब्रुवारी २०२६ ला हजर राहण्याचे बजावले नोटीस.

देहूरोड, ५ नोव्हेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायाची मागणी करणाऱ्या आंदोलका च्या कंबरेला ‘फिल्मी स्टाईल’ने लाथ मारणाऱ्या डी.वाय.एस.पी अनंत कुलकर्णी यांच्या अमानवी कृत्याची राज्य मानव हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. देहूरोड येथील मानव हक्क व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जोगदंड यांच्या तक्रारीवरून आयोगाने राज्य गृह विभागाचे सहसचिव व जालना पोलिस अधिक्षक यांना २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील राज्य मानव हक्क न्यायालयात हजर राहून अहवाल सादर करण्याचे नोटीस बजावले आहेत. या प्रकरणात तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी वर शिस्तभंग कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.या घटनेचे ड्रामॅटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीच्या दुसऱ्या लग्नाच्या मुद्द्यावर न्याय मागणीसाठी उपोषण करणारे गोपाल रमेश चौधरी व अमित चौधरी हे दोन अंदोलक पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि डी.वाय.एस.पी अनंत कुलकर्णी यांनी मागून येऊन आंदोलकाच्या कंबरेला जोरदार लाथ मारली. या व्हिडिओत कुलकर्णी हे चित्रपटातील पोलिसां प्रमाणे उडी मारून लाथ मारताना दिसत आहेत, ज्यामुळे ‘लोकशाही की ठोकशाही’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याने बळाचा वापर करावा लागल्याचे डी.वाय.एस.पी कुलकर्णी यांचे स्पष्टीकरण असले तरी, ही कृती संविधानिक मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे मानव हक्क कार्यकर्ते सांगतात. जोगदंड यांनी “ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन” या संस्थेच्या वतीने राज्य मानव हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. याशिवाय, त्यांनी राज्याचे गृह मंत्री यांनाही पत्र लिहिले, परंतु गृह विभागाकडून दखल घेतली गेली नाही. मात्र, आयोगाने तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ‘कारणे द्या’ नोटीस जारी केली आहे. यात प्राथमिक चौकशी, फौजदारी कारवाईची शक्यता आणि खातेनिहाय तपासाची मागणी करण्यात आली आहे.





