सामाजिक

प्रशांत जोगदंड यांच्या तक्रारीनंतर भंडारा डोंगरावरील बौद्ध स्तूप संवर्धनाची प्रक्रिया गतीमान

दिनांक, २७ नोव्हेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी येथे असलेल्या प्राचीन बौद्ध स्तूपावर अज्ञात व्यक्तींनी २ नोव्हेंबर २०२५ रोजी साडी, झंपर, बांगड्या, मंगळसूत्र, चप्पल आदी वस्तू ठेवून देवपूजेसारखी पूजा-अर्चा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कृतीमुळे बौद्ध समुदायाच्या भावना दुखावल्या असून याबाबत प्रशांत लहू जोगदंड यांनी लेखी तक्रार दाखल केली होती.

या संदर्भातील तक्रार तहसीलदार, गृह शाखा तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी, पुणे शहर यांनी पुरातत्व विभागाकडे पाठवली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या विभागीय कार्यालय, पुणे यांनी अधिकृत पत्राद्वारे आपले मत नोंदवले आहे.

स्तूप पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली नसल्याचे स्पष्टीकरण :-
पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगरावरील बौद्ध स्तूप हे त्यांच्या थेट नियंत्रणाखाली नसल्यामुळे तेथे विभागामार्फत कोणताही पहारेकरी नेमलेला नाही. मात्र, प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता स्तूपावर चुकीच्या वस्तू ठेवून पूजा करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे विभागाने नमूद केले आहे.

जतन व संवर्धनासाठी काम सुरु :-
स्तूपाचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने या स्मारकाच्या जतन व संवर्धनाचे काम हाती घेतले असून संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती सहायक संचालक (पुरातत्त्व) डॉ. विलास वाहणे यांनी दिली.
दुरुस्ती आणि जतन कार्याच्या दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावणे, तसेच बौद्ध लेणी पर्यटकांसाठी व्यवस्थितरित्या खुली करणे यासंबंधीची कामे करण्यात येणार आहेत.

या घटनेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्त्याकडून करण्यात आली असून आता या प्रकरणात पुढील कार्यवाहीकडे बौद्ध समाजाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button