संविधान प्रचारक नुरखाँ पठाण यांना ‘समाज प्रबोधन पुरस्कार’ प्रदान

पुणे खबर
दि. २३ एप्रिल २०२६
‘साथी चंदुभाई मेहता जन्मशताब्दी’ निमित्त आयोजित भव्य सोहळ्यात संविधान प्रचारक तथा समाजप्रबोधन कार्यकर्ते नुरखाँ पठाण यांना ‘समाज प्रबोधन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘साथी चंदुभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान’च्या वतीने प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार तुषार गांधी (महात्मा गांधी यांचे पणतू) व हेमंत गोखले (माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय) यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. ५०,०००/- चा धनादेश प्रदान करण्यात आला.
नुरखाँ पठाण हे ‘घर-घर संविधान’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर संविधान जनजागृतीचे कार्य करत असून, विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत संविधानाचे मूल्य पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संविधान गुणगौरव समिती’च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांसाठी संविधान परीक्षा घेण्यात आली असून, विविध स्तरांवर जनजागृतीचे प्रभावी जाळे उभे राहिले आहे.
पुरस्कार स्वीकारताना नुरखॉं पठाण यांनी हा सन्मान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करत, हा सन्मान आपल्या सर्व सहकाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मातोश्री, पत्नी शबनम पठाण, दोन्ही कन्या व त्यांच्या संपूर्ण टीमला दिले.
कार्यक्रमातील सर्वात प्रेरणादायी क्षण म्हणजे, पुरस्कार स्वरूपात प्राप्त झालेला रु. ५०,०००/- चा धनादेश नुरखॉं पठाण यांनी आपल्या मातोश्रींच्या हस्ते पुन्हा ‘चंदुभाई मेहता प्रतिष्ठान’ला अर्पण केला. त्यांच्या या कृतीतून निस्वार्थ समाजसेवेचा उच्च आदर्श समाजासमोर ठेवला गेला.
या प्रसंगी संस्थेचे प्रमुख सुधीर देसाई, सरस्वती गायकवाड, विलास पवार, माधुरी सपकाळे-बोराळे, माला मेश्राम, शबनम पठाण तसेच अनेक मान्यवर व संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
नुरखाँ पठाण यांचे कार्य हे केवळ प्रबोधन पुरते मर्यादित नसून, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.




