बाबासाहेब (उर्फ) पवन कांबळे सेलूकर यांची रेणापूर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती.

पुणे खबर दि. १० जून २०२६
लातूर, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व वंचित घटकांच्या हक्कांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब (उर्फ) पवन बाळू कांबळे (सेलूकर) यांची अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत कार्यरत असलेल्या रेणापूर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार तसेच नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे महाराष्ट्र राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. पवन कांबळे यांनी सामाजिक न्याय, मानवाधिकार, दलित अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देणे, शासकीय योजनांची जनजागृती करणे आणि वंचित समाजघटकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रेणापूर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती ही अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, पीडितांना तात्काळ मदत व न्याय मिळवून देणे, तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे यासाठी कार्यरत असते. समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून पवन कांबळे यांचा अनुभव आणि सामाजिक कार्याचा वारसा समितीच्या कामकाजाला अधिक बळकटी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस, लातूरचे पदाधिकारी, विशेष सरकारी वकील प्रेमनाथ देडे, सोमनाथ ढगे, संजय माकेगावकर, दिलीप आदमाने, रानबा वारकरी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना पवन कांबळे म्हणाले की, “अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश व निर्देशांचे काटेकोर पालन, तसेच अत्याचारग्रस्तांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी समितीमार्फत ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जातील. समाजातील दुर्बल घटकांवरील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, कायद्याच्या चौकटीत राहून पीडितांच्या संरक्षणासाठी आणि न्यायासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”
पवन कांबळे यांच्या या नियुक्तीमुळे रेणापूर उपविभागातील अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या न्याय व हक्क संरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.


