शिक्षण मंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सचिन चव्हाण यांचा देहूरोड येथे होणार नागरी सत्कार.

पुणे खबर
१६ जानेवारी २०२६
देहूरोड: प्रतिनिधी
धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था, भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय संविधान सन्मान रॅली संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी (OSD) सन्माननीय सचिन चव्हाण हे देहूरोड येथील रमाई विद्यार्थी निवास संकुल (धम्मसदन) प्रकल्पास सदिच्छा भेट देणार असून, त्यानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम शितळानगर येथील धम्मसदन परिसरात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष के.एच. सूर्यवंशी असतील.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रा. निर्मला सोनवणे, माजी प्राचार्य प्रा. सुदामराव औचरे, ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी, खडकीतील सामाजिक नेते मुकेश चागे, प्रा. बाळासाहेब धावारे आणि पनवेल येथील अध्यापिका अश्लेषा जगताप उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल नाईकनवरे, भारतीय बौद्ध महासभेचे (देहूरोड शहर) अध्यक्ष प्रकाश कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा कांबळे आणि भारतीय संविधान सन्मान रॅली समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे व त्यांचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
देहूरोड शहर व पंचक्रोशीतील सर्व उपासक, उपासिका आणि हितचिंतकांनी या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




