देहूरोड

किन्हईत लाक्षणिक उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

पुणे खबर डिजिटल मिडिया
३० जुलै २०२५

देहूरोड :- कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून त्या ऐवजी देहूरोड नगरपरिषद स्थापन करण्याच्या मागणीसाठी किन्हई गावातील ग्रामविकास मंडळाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, गाव एकसंघपणे रस्त्यावर उतरले.

हे उपोषण बुधवार दिनांक ३० जुलै रोजी हनुमान मंदिर, किन्हई येथे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत पार पडले. उपोषणामध्ये खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:

🔹 देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द करून नगरपरिषद स्थापन करावी
🔹 स्थानिक भूमिहीन पुत्रांना सरकारी डेपोमध्ये नोकऱ्या द्याव्यात
🔹 देहू-देहूरोड पालखी मार्गाचे चौपदरीकरण करावे
🔹 नवीन घरे व जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांना परवानगी मिळावी
🔹 ब्रिटिश काळात जमिन गमावलेल्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के मोबदला द्यावा
🔹 भूमिहीन शेतकऱ्यांना अधिकृत प्रमाणपत्र मिळावे
🔹 केंद्र व राज्य सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावा
🔹 रेडझोनची हद्द केवळ अम्म्युनिशन डेपोपुरती मर्यादित ठेवावी
🔹 भूमिहीन शेतकऱ्यांच्या पाल्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य द्यावे

या आंदोलनास देहूरोड शहर कृती समिती व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. उपोषणाचा समारोप देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन शांततेत करण्यात आला.

या वेळी रघुवीर शेलार, धर्मपाल तंतरपाळे, रमेश जाधव, दीपक चौगुले, ॲड. कृष्णा दाभोळे, सागर लांगे, संजय पिंजण, बबन पिंजण, सविता पिंजण, ज्योती पिंजण आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

सध्या ही जनआंदोलनाची लाट चिंचोली, झेंडमळा, काळोखे मळा, शेलारवाडी, मामुर्डी यांसारख्या भागात पोहोचली आहे. येत्या ८–१० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको, हायवेवर रास्ता रोको व कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button