शैक्षणिक

खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न.

राजगुरुनगर, दि. ४ जून २०२५ :

कुठल्याही खाजगी शिकवणी शिवाय बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेले यश खरोखर प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी यांनी केले.

खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यम विद्यालय या तीनही प्रशालेतील इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका, रेखाताई क्षोत्रिय, उमाताई सांडभोर, संचालक गणेश घुमटकर, स्वानंद खेडकर, राहुल कुंभार, महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सुभाष देशमुख, इंग्रजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता गुजराथी, मनिषा भुजबळ, अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

गणेश जोशी पुढे म्हणाले की खाजगी शिकवणी न लावता इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवता येऊ शकते हे आजच्या तीनही विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेले आहे. संस्थेने केलेले परिपूर्ण नियोजन, तीनही विद्यालयातील अधिकारी वर्गाने केलेली अंमलबजावणी, अध्यापक वर्गाने केलेले प्रभावी अध्यापन, विद्यार्थी व पालकांनी केलेले परिश्रम याचा एकूण परिणाम म्हणजे तीनही विद्यालयातील उत्कृष्ट निकाल आहे. संस्थेची ही निकालाची दैदीप्यमान परंपरा सातत्यपूर्ण वृद्धिंगत होत आहे, याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे.

यावेळी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयात १०० टक्के गुण मिळवून प्रथम आलेली कनुप्रिया सांडभोर, इंग्रजी माध्यम विद्यालयाची पूजा बावके, कनिष्ठ महाविद्यालयाची अनुष्का लोणारी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री सुपे यांनी मनोगत व्यक्त केले.

महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या संध्या कांबळे यांनी केले. इंग्रजी माध्यम विद्यालयाचे बक्षीस वितरणाचे वाचन रूपाली मांजरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गोडसे यांनी केले. आभार प्रदर्शन सीमा आनंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button