पिंपरी न्यूज

चिखलीतील बालघरे नगर, राजे शिवाजीनगरमधील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात – अकबर मुल्ला यांची प्रशासनाकडे मागणी.

पुणे खबर प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड २८ जुलै २०२५

चिखली परिसरातील बालघरे नगर आणि राजे शिवाजीनगर येथील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यवस्थापन विभागाचे शहराध्यक्ष अकबर मुल्ला यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.

गट क्रमांक ७५४/७५५ अंतर्गत येणाऱ्या या परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, वाहतुकीसाठी सुरक्षित नाहीत. रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे परिसरात नियमितपणे साफसफाई होत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत नाराजी आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियमित कचरा उचलणे व रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

सदर परिसरातील मुख्य रस्त्यांवर अद्यापही स्ट्रीट लाईट खांब बसवण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघात व चोरीच्या घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्ट्रीट लाईट खांब बसवून रस्त्यांना प्रकाशमान करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य गुन्हेगारी घटनांना रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी,अशी जोरदार मागणी अकबर मुल्ला यांनी केली आहे.

“या परिसरातील नागरिक नियमितपणे कर भरतात, त्यामुळे त्यांना मुलभूत सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. बालघरे नगर आणि राजे शिवाजीनगर या भागात त्वरित सुधारणा करून नागरिकांना दिलासा द्यावा,” असेही त्यांनी निवेदन पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button