देहूरोड

देहूरोड छावणी परिषदेत प्रसूतीगृह व नव्या शाळा इमारतीचे लोकार्पण; आरोग्य-शिक्षण सुविधांना चालना

पुणे खबर (सहसंपादक अशोक कांबळे )

देहूरोड : दि. १८ जून २०२६

देहूरोड छावणी परिषद हद्दीतील नागरिकांसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन विकासकामांचे लोकार्पण सोहळा मंगळवार ( ता.१६ ) जून रोजी संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेले प्रसूतीगृह तसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, मामुर्डी येथील नवीन शाळा इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर ) निधीअंतर्गत जीई एरोस्पेस यांच्या सहकार्याने ही कामे पूर्ण करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मालमत्ता दक्षिण कमांडचे प्रधान संचालक सी. रवींद्र यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.नवीन प्रसूतीगृहाचे बांधकाम किंमत सुमारे रु. १.४० कोटी असून शाळा इमारतीसाठी रु. २.४० कोटी खर्च करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे देहूरोड छावणी परिषद व परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.यावेळी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष कटोच , छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव, मनोनीत सदस्य ऍड. कैलास पानसरे, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास चाटे उपस्थित होते.

जीई एरोस्पेसतर्फे कार्यकारी संचालक अमोल नागर, व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजीत सिंह, कार्यकारी उड्डाण संचालन प्रमुख मार्सेलो एन. एस. कौटिन्हो, युनायटेड वे ऑफ दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजीत रंजन तसेच समन्वयक अजय मनसुके आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ( सीएसआर ) उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. नवीन प्रसूतीगृहामुळे माता व नवजात बालकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार असून अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान प्रयोगशाळेसह , सुसज्ज शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.देहूरोड छावणी परिषद व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला असून या विकासकामांमुळे परिसराच्या सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन छावणी परिषदेचे अधिकारी सुनील गुरव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button